छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच शहरातील विविध मंदिर परिसर, सार्वजनिक उद्याने तसेच वडाच्या झाडांजवळ महिलांनी पूजेसाठी गर्दी केली.
पारंपरिक पेहराव, हातात पूजेची थाळी, हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू अशा साजशृंगारात महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून अखंड सौभाग्य, पतीचे उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. वटपौर्णिमेनिमित्त शहरातील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. महिलांनी वडाच्या झाडाभोवती पवित्र धागा गुंडाळत फेऱ्या मारल्या. वटसावित्रीची कथा श्रवण करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली. अनेक ठिकाणी सामूहिक पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसर आणि
वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच नवविवाहित महिलांनी प्रथमच वटपौर्णिमेचे व्रत करत परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. अनेकांनी पारंपरिक पैठणी, नऊवारी तसेच आकर्षक साड्या परिधान करून सणाचा आनंद लुटला. शहरातील विविध भागांत महिलांनी एकमेकांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणित केला. धार्मिक श्रद्धेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही अनेक सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी दिला. वडाचे झाड पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून
त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. दिवसभर शहरातील विविध भागांत भक्तिमय वातावरण कायम दिसून आले. श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडविणाऱ्या वटपौर्णिमा उत्सवामुळे शहरातील वातावरण मंगलमय झाले. महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने वडाचे पूजन करून कुटुंबाच्या आणि पतीच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच निसर्गप्रति कृतज्ञता देखील व्यक्त केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












