छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): ब्रिजवाडी
येथील उत्तरानगरीत कब्रस्तानासाठी १० गुंठे जागा देण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर एका खासगी जागेचे कंपाउंड तोडण्यात आले. यावेळी शिवीगाळ व धमकी देण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब काकडे, अश्पाक शेख, रेहमान पटेल, आशिम शेख यांच्यासह इतर १०-१२ जणांना संशयित आरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणी अजय रामराव शिंदे (वय ४३, रा. अशोकनगर, मसनतपूर, चिकलठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते स्क्रॅपचा व्यवसाय करतात. उत्तरानगरीत त्यांच्यासह जितेंद्र कृष्णराव टाकळकर, सागर वल्लभबागला, नलीन महेंद्र सुराणा, विजय इंदरराज जैन, ऋतिक रंजन अग्रवाल आणि सुशील सुभाष धूत यांच्या संयुक्त मालकीची आहे. या संपूर्ण जागेला सिमेंट पोलचे कंपाउंड आहे. काम सुरू असताना अश्पाक, रेहमान, आशिम शेख आणि त्यांच्या साथीदारांनी तेथे येऊन कब्रस्तानासाठी १० गुंठे जागा द्या; अन्यथा तुम्हाला बांधकाम करू देणार नाही, अशी
धमकी दिली. वाद वाढू नये म्हणून त्यावेळी पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही.
शुक्रवारी ब्रिजवाडी येथील जागेचे कंपाउंड काही जण तोडत असल्याचे समजले. यावरून शिंदे तेथे पोहोचले असता तेथे सुमारे १०० ते १५० जणांचा जमाव होता. अश्पाक शेख, रेहमान पटेल, आशिम शेख आणि त्यांच्या साथीदारांनी नऊ सिमेंट पोल पाडून नुकसान केले. त्यावेळी समजूत घातल्यानंतर संबंधित तेथून निघून गेले. नगरसेवक काकडे यांच्यासह काही लोक तेथे आले. लोकांनी तेथील सर्व कंपाउंड पाडून टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












