छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातून किराणा सामान घेऊन पिसादेवी रोडवरील घराकडे परतणार्या दुचाकीस्वार कंपनी कामगाराचा भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १४) रात्री ९ वाजेच्या सुमारास पिसादेवी रोडवरील वैशाली ढाब्यासमोर घडली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. रवींद्र बाजीराव पाटील (५१, मूळ रा. भडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. पिसादेवी रोड) असे या मृताचे नाव आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ते पिसादेवी रोड परिसरात राहायला गेले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. दीड तास मृतदेह रस्त्यावरच अपघातानंतर ट्रॅक्टरचालक न थांबता पळून गेला. जवळपास दीड तास पाटील यांचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. घटनेची माहिती मिळताच हर्सूल ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक केशव काकडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पसार झालेल्या ट्रॅक्टरचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.













