मनपा आयुक्तांच्या अॅक्शन मोडनंतर ऐतिहासिक पानचक्की चकाकली अवघ्या दोन तासांत ३ टन कचरा साफ

Foto
छत्रपती
संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली शहरातील ४०० वर्षे जुनी ऐतिहासिक पानचक्की अखेर कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त झाली. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी परिसराला अचानक भेट देत पाहणी केली होती. यावेळी पानचक्कीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते आतल्या परिसरापर्यंत सर्वत्र पसरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच तत्काळ परिसर स्वच्छ करण्याचे कडक आदेश दिले.
आयुक्तांच्या या अॅक्शन मोडनंतर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन
विभागाने शनिवारी सकाळी या ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवले. मनपा कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासांत युद्धपातळीवर काम करत तब्बल ३ टन कचरा गोळा केला. या मोहिमेदरम्यान कचऱ्याने भरलेल्या सुमारे ६५ मोठ्या पिशव्या जप्त करून परिसर कचरामुक्त करण्यात आला.
पानचक्की हे शहराचे वैभव असून ते पाहण्यासाठी देश-विदेशातून दररोज शेकडो पर्यटक येत असतात. अशा ऐतिहासिक ठिकाणी पसरलेल्या अस्वच्छतेमुळे शहराच्या प्रतिमेला धक्का बसत होता, अखेर मनपाच्या तत्परतेमुळे या वास्तूने मोकळा श्वास घेतला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions