पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्ध दाम्पत्यास लुटले

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्यूरो): : शहरात नकली पोलिसांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, मुकुंदवाडी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस असल्याची बतावणी करून सव्वा लाख रुपयांचे दागिने जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उमराव मारोतीराव निकम (वय ७४ वर्षे, रा. विठ्ठलनगर, मुकुंदवाडी) हे
सेवानिवृत्त गृहस्थ आहेत. दिनांक ३१ मे २०२६ रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास निकम हे आपल्या पत्नीसह स्कुटीवरून मुकुंदवाडी बसस्टॉप जवळील लाईफ हॉस्पिटल समोरून जात होते.
दरम्यान, पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून त्यांनी वृद्ध दाम्पत्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भामट्यांनी धाक दाखवून उमराव निकम यांच्या हातातील प्रत्येकी चार
ग्रॅम वजनाच्या ६०,००० रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (एकूण किंमत १,२०,००० रुपये बळजबरीने हिसकावून घेतल्या आणि घटनास्थळावरून पोबारा केला. पहाटेच्या वेळी घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे पुढील तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions