विद्यापीठाने केली परीक्षा मानधनात १५ टक्क्यांची वाढ

Foto

संभाजीनगर, छत्रपती (सांजवार्ता ब्युरो) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेसंबंधीच्या मानधनाची पुनर्रचना करत त्यात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या मानधन वाढीमुळे विद्यापीठाच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान, या वाढीवर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली असून, किमान ३५ टक्के वाढ मिळायला हवी होती, असा सूर प्राध्यापक वर्गातून उमटत आहे.
विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या पदवी व पदव्युत्तर
परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकन (व्हॅल्युएशन) आणि परीक्षेसंबंधीच्या इतर कामांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत एकूण आठ प्रस्तावांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. विद्यापीठाने मानधन वाढीसाठी माजी अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार परीक्षा मंडळाने १५ टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे.
३५ टक्के वाढीची होती अपेक्षा
विद्यापीठाने जाहीर केलेली १५ टक्के वाढ तोकडी असल्याचा आक्षेप तासिकातत्त्वावरील प्राध्यापकांनी घेतला आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत ही वाढ निराशाजनक असून, प्राध्यापकांच्या श्रमाचा विचार करता किमान ३५ टक्के वाढ करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया प्राध्यापकांमधून व्यक्त होत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions