छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर रिक्षावर थुंकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका चालकाला बेदम मारहाण करत, त्याची रिक्षा पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करत मिसारवाडीतील तीन आरोपींना अटक केली आहे.
शेख मोबीन शे. अजीज, उजेफ वसीम खान आणि अजीम कासीम पठाण अशी अटकेतील संशयितांची नावे असून, शेख मोसीन शेख मुनीर (रा. बेगमपुरा) यांनी तक्रार दिली आहे. २९ मे रोजी बसस्थानकाबाहेर मोबीन हा मोसीन यांच्या
रिक्षावर थुंकल्याने वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी एका महिलेला पुढे करून रचलेल्या कटानुसार मोसीन यांना भाड्याच्या बहाण्याने मिसारवाडीत बोलावून घेतले. तिथे पोहोचताच महिलेने मोसीन यांचा मोबाईल घेऊन हल्लेखोरांना बोलावले. काही वेळातच आलेल्या आरोपींनी मोसीन यांना रिक्षात कोंबून बेदम मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. नागरिकांनी जमा होताच आरोपी रिक्षा घेऊन पसार झाले होते. पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके पुढील तपास करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions











