छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : घर रिकामे करण्याच्या वादातून आणि पाणी मागितल्याच्या कारणावरून घरमालकाच्या कुटुंबीयांनी एका २८ वर्षीय भाडेकरू गर्भवती महिलेला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिल्याची घटना जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत घडली. यात दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा गर्भपात झाला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात घरमालकाच्या कुटुंबीयातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या घरातील पाणी संपल्यामुळे ती
घरमालकाकडे पाणी मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरमालकाने पाणी देण्यास नकार देत तिला घर रिकामे करण्यास सांगितले. व्यवस्था करण्यासाठी थोडा वेळ मागितला. संतापलेल्या घरमालकाच्या कुटुंबीयांनी तिला धक्काबुक्की करीत आरोपींनी महिलेला पायऱ्यांवरून खाली ढकलले. तोल गेला आणि ती पायऱ्यांवरून खाली कोसळली. डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध पडली. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पोटाला बसलेल्या गंभीर मारामुळे तिचा गर्भपात झाला. घटनेचा तपास बेगमपुरा पोलीस करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












