कुख्यात म्होरक्याला दिल्लीतून अटक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): समृद्धी महामार्गावर राहुरी येथील एका उद्योजकावर हल्ला करून लुटमार करणाऱ्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील कुख्यात म्होरक्या परशुराम गायकवाड याला त्याच्या एका सहकाऱ्यासह थेट दिल्लीतून अटक करण्यात आली. या मोहिमेत आतापर्यंत टोळीतील पाच सदस्यांना गजाआड करण्यात आले असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
२६ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर हडस पिंपळगावजवळ राहुरी येथील उद्योजक साहिल सोनवणे (वय २२) आणि
त्यांच्या मित्राला अडवून दरोडेखोरांनी लुटले होते. या घटनेनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या दिशांना पसार झाले. म्होरक्या परशुराम गायकवाड आणि करण जाधव कारने थेट दिल्लीला पळाले. पोलिसांनी मागोवा घेऊ नये म्हणून त्यांनी मोबाईलचे सिम कार्ड फेकून दिले होते आणि केवळ सार्वजनिक वाय
फायचा वापर करून व्हॉट्सअॅप व टेलिग्राम कॉलिंगद्वारे उर्वरित साथीदारांशी संपर्क साधत होते. मात्र, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दिल्लीत धाड टाकून दोघांना पकडले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये परशुराम मोहन गायकवाड (वय २६, रा. पाथर्डी), करण भरत जाधव (२२, रा. बीड), किरण अजिनाथ
गायकवाड (२५, रा. शिरूर कासार), करण जयराम जाधव (रा. बीड बायपास) आणि पंडित उर्फ चन्नाप्पा सखाराम लष्करे (रा. बीड) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी परशुरामवर हत्या, गोळीबार, दरोडा आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले यांसारखे २५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असून तो आठ जिल्ह्यांतील पोलिसांना हवा होता.
करोलबागेत खरेदी करताना अटक
सोमवारी दिल्लीतील करोलबाग बाजारपेठेत खरेदी करीत असताना परशुराम आणि करण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी दुसऱ्या पथकाने अनिल जयराम जाधवला नाशिक जिल्ह्यातील येवला येथून पकडण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली कार त्याच्याकडून जप्त करण्यात आली. पंडित उर्फ चन्नाप्पा सखाराम लष्करे याला बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्य आरोपीवर २६ गुन्हे
टोळीचा म्होरक्या परशुराम गायकवाड याच्यावर छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, अहिल्यानगर, बीड, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा आणि धाराशिव या ८ जिल्ह्यांत २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. परराज्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. बीड पोलिसांनी त्याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई मंजूर केली होती. मात्र, तो गेल्या वर्षभरापासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता आणि राजरोसपणे लुटमार करीत होता. मे महिन्यात त्याने मुक्ताईनगरमध्ये दरोडा टाकला होता. हत्येचा प्रयत्न, गोळीबार, दरोडा, लुटमार, गुटखा तस्करी, शस्त्र तस्करी आणि शासकीय अधिकाऱ्यांवरील प्राणघातक हल्ल्यांसह त्याच्यावर २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














