पैठण, (प्रतिनिधी) : प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण हे प्रत्येक युगात समाजाला दिशा देणारे शहर तर होतेच तसेच भारतीय उपखंडातील एका बलाढ्य साम्राज्याची राजधानीचे शहर म्हणूनही ते प्रसिद्ध होते.
असे उदगार प्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी जयवंत पाटील लिखित प्रतिष्ठान या बृहत ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्ताने काढले. याप्रसंगी जेष्ठ कवी लेखक अशोक बागवे यांनीही पैठण नगरीचा महिमा कथन केला. कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था व यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात प्रतिष्ठान या ग्रंथाचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक केवळ एक पुस्तक नसून तो एक महान ग्रंथ आहे व येणाऱ्या पिढीला तो मार्गदर्शन ठरेल असे गौरव उद्गारही अशोक बागवे यांनी याप्रसंगी काढले.
स्टर्लिंग कॉलेज नेरुळ नवी मुंबई येथील भव्य सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी रसिकांनी अलोट गर्दी केली होती. पैठणचे ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वातंत्र्यसैनिक कै. बाळासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून हा ग्रंथ सिद्ध झाल्याचे लेखक जयवंत पाटील यांनी याप्रसंगी सांगितले उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या या कार्यक्रमात वक्त्यांच्या भाषणाने रसिकांचे कान तृप्त झाले दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून हा ग्रंथ साकारला असून पैठणच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा उगवता आढावा या ग्रंथात घेण्यात आलेला आहे व प्रतिष्ठानच्या सर्व परंपरा संत साहित्य इतिहास यांचाही समावेश या पुस्तकात आहे याप्रसंगी ललित पाठक, प्रवीण पाटील, डॉक्टर अनिल पाटील व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.














