शैक्षणिक
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने दुसऱ्या सत्राचा उत्साहात प्रारंभ
दिवाळीच्या सुट्यानंतर शाळा पुन्हा गजबजल्या !
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे काही दिवस विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविना शांत असलेल्या शाळांचे परिसर सोमवारपासून पुन्हा गजबजू लागले. सणासुदीचा आनंद, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि सहलींच्या रम्य आठवणी मनात साठवून विद्यार्थी नव्या उत्साहाने शाळेत परतले. मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आगमनाने पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून दुसऱ्या शैक्षणिक सत्राचा उत्साहात प्रारंभ झाला आहे.
दिवाळीच्या वीस दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अभ्यासाच्या धावपळीतून
विश्रांती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मित्र-मैत्रिणींच्या भेटी, सुट्टीतील गंमतीजमतींची देवाणघेवाण, दिवाळीच्या आठवणींचे कथन आणि वर्गातील गप्पांमुळे शाळांचे वातावरण
बालसुलभ उत्साहाने भारावून गेले. अनेक दिवसांनी भेटलेल्या मित्रांच्या गाठीभेटींनी वर्गखोल्यांमध्ये पुन्हा हास्य आणि उत्साहाची रेलचेल पाहायला मिळाली. सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले.
महाराष्ट्र हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र तायडे म्हणाले, दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहाने शाळेत हजेरी लावली आहे. सुट्टीतील आनंददायी आठवणींसोबतच त्यांनी आता अभ्यासात नियमितता, शिस्त आणि सातत्य राखणे आवश्यक आहे. आगामी पॅट परीक्षेच्या अनुषंगाने
विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
गुजराती बॉईज हायस्कूलचे शिक्षक काकासाहेब उगले म्हणाले, सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून समाधान वाटते. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या उत्साहाचे रूपांतर अभ्यासातील एकाग्रता, नियमित वाचन, लेखन आणि सरावात व्हावे. विद्यार्थ्यांनी नव्या सत्रात सातत्यपूर्ण प्रयत्नांतून शैक्षणिक प्रगती साधावी.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













