संभाजीनगर, छत्रपती (सांजवार्ता ब्युरो) शहरातील गुन्हेगारी विश्वाला शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हेगारांना विक्री करण्यासाठी पंजाब आणि इतर राज्यांतून ऑनलाईन कुरिअरद्वारे मागवलेला प्राणघातक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा पोलिसांनी मिसारवाडी परिसरात छापा टाकून जप्त केला. मंगळवारी (दि. ९) दुपारी केलेल्या या धडक कारवाईत तब्बल ६६ चाकू, सुरे आणि फायटर अशी भयानक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून समीर खान सलीम खान ऊर्फ सोनू (वय २६) याला
E
बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याचा लहान भाऊ आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मुनावर खान सलीम खान ऊर्फ लाला (वय २४) हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अधिक माहितीनुसार, समीर
खान आणि मुनावर खान (दोघे रा. मिसारवाडी गल्ली क्र. ७) या दोघा भावांकडे अवैधरीत्या शस्त्रे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाने छापा मारला. समीरच्या घरातून ५८ चाकू
आणि ८ फायटर असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी समीरला अटक करण्यात आली असून, त्याचा भाऊ मुनावर फरार झाला आहे. मुनावर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात यांपूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
अवघ्या ७०० रुपयात शस्त्रे
अवघ्या ७०० ते २ हजारांत ही शस्त्रे विकली जात होती. आतापर्यंत कोणी कोणी शस्त्रे विकत घेतली आणि टोळीतील इतर सदस्य, संपर्कातील पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपींच्या मोबाईलच्या कुंडलीवरूनही अनेकजण निष्पन्न होणार आहेत. कोणत्या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून हा साठा शहरात आला, याचाही शोध घेतला जात आहे.
पंजाब व इतर राज्यातील कनेक्शन
हे दोन्ही भाऊ एका मोठ्या टोळीचा भाग असण्याची शक्यता आहे. विदेशी बनावटीचे, दिशादर्शक आणि टॉर्च असलेले चाकू, रामपुरी, मोठे घाव अशी धारदार शस्त्रे त्यांनी पंजाब आणि इतर राज्यांतून ऑनलाईन व कुरिअरद्वारे मागवली होती. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार राजेंद्र साळुंके, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, मनोहर गीते, राजेश यमदळ आदींच्या पथकाने केली.
दुचाकीही चोरी करायचे
या कारवाईदरम्यान समीरकडे चोरीची हिरो एचएफ डिलक्स (एमएच-२०-एफडब्ल्यू-०२६७) दुचाकीही मिळून आली. ही दुचाकी सिडको ठाण्याच्या हद्दीतूनकाही महिन्यापूर्वीच चोरीला गेली होती. शहरातून चोरीला जाणाऱ्या दुचाकी मिसारवाडी भागात आणून स्क्रैप केल्या जात असल्याचा पोलिसांना दाट संशय असून, त्या दिशेनेही आता पोलिस तपास करीत आहेत.
https://epaper.san/warta.in/Powered By: Vrudhee Solutions











