आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे : जी. श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उमेदवारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे, मंजुषा मिसकर, देविदास टेकाळे व उमेदवार उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेबाबत काही तक्रारी किंवा सूचना
असल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असेही श्रीकांत यांनी सांगितले. या मतदारसंघात एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार असून, मतदानासाठी ८४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ३५० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत ओळखपत्रे सादर करावीत.
ओळखपत्राशिवाय मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्यास मनाई आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर मतदारांमध्ये भेदभाव निर्माण
मतमोजणीसाठी ७० टेबल
मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी वंदे मातरम् सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या तीन ते चार दिवस आधी प्रतिनिधींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी. मतमोजणीसाठी ७० टेबल व टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल, असे एकूण ७१ टेबल असतील. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक टेबलासाठी एक याप्रमाणे ७१ प्रतिनिधी नेमता येतील. मतमोजणीत आवश्यक मतसंख्या कोणत्याही उमेदवाराला न मिळाल्यास सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण केले जाईल. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे व मंजुषा मिसकर यांनी निवडणूक प्रक्रिया, आचारसंहितेचे पालन, मतदान प्रतिनिधींची नियुक्ती, प्रचार साहित्याच्या मुद्रणाचे नियम व मतदानाच्या दिवशी पाळावयाच्या नियमांची माहिती दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















