प्रतापनगरात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ

Foto
पती-पत्नीला ओलीस ठेवून ३ लाखांची रोकड व ५ तोळे सोन्याची लूट
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : शहराच्या मध्यवर्ती आणि पॉश वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतापनगर भागात सोमवारी पहाटे सशस्त्र दरोड्याचा थरार घडला. कासलीवाल विहारच्या समोर राहणारे व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्याचा दरवाजा हातोड्याने तोडून पाच दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी लाहोटी आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीच्या मानेवर व पोटावर थेट कोयते रोखून धरत त्यांना तब्बल ४५ मिनिटे ओलीस ठेवले. यानंतर घरातून ३ लाख रुपयांची रोकड, पाच तोळे सोने आणि चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले. या धाडसी दरोड्यामुळे शहरातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली
आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे ३:१५ ते ४:०० च्या
दरम्यान घडली. घटनेच्या वेळी व्यावसायिक संजय लाहोटी आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी बेडरूममध्ये झोपेत होते. याचाच फायदा घेत ३० ते ३२ वयोगटातील पाच दरोडेखोरांनी आधी बंगल्याच्या मागील बाजूची लोखंडी जाळी कापली. त्यानंतर मुख्य लाकडी
दरवाजाची चौकट हातोड्याने फोडून त्यांनी घरात प्रवेश केला. सर्व गुन्हेगारांनी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी चेहऱ्यावर काळे मुखवटे आणि हातामध्ये हातमोजे घातले होते. त्यांच्याकडे कोयते, लोखंडी सळ्या, काठ्या आणि हातोड्यासारखे घातक हत्यारे होते.
जिवंत मारण्याची धमकी
दरोडेखोरांनी लाहोटी यांचे बेडरूम गाठले आणि त्यांना जागे करून शस्त्रांचा धाक दाखवला. आरडाओरडा केला तर जागच्या जागी संपवून टाकू, अशी धमकी देत दरोडेखोरांनी दोघांच्याही अंगावर कोयते रोखले. जवळपास पाऊण तास लाहोटी दाम्पत्याला ओलीस ठेवून दरोडेखोरांनी घरातील कपाटांची आणि लॉकरची तोडफोड केली. लॉकरमध्ये ठेवलेली ३ लाख रुपयांची रोख रक्कम, ५ तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा ऐवज गोळा करून दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
श्वानपथकाला पाचारण
दरोडेखोर निघून गेल्यानंतर सुटका झालेल्या लाहोटी यांनी उस्मानपुरा पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांचा सुगावा लावण्यासाठी तात्काळ फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पुढील तपास पोलीस करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions