औरंगाबाच्या पोलीस कर्मचाऱ्याला जालन्यात 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Foto
औरंगाबाद शहरातील क्रांती पोलीसचौकीचे पोलीस कर्मचारी रमेशलाल रामलाल जैस्वाल यांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून 15 हजारांची लाच घेतांना जालना जिल्ह्यातील मंठा गाव ते पंचायत समिती मंठा रोडवर जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीमुसार, आईविरुध्द दाखल असलेल्या कलम 420 च्या गुन्ह्यात जामीन करुन देण्यासाठी व त्यांना महाराष्ट्रातील इतर गुन्ह्यांमध्ये आरोपी न करण्यासाठी पोलीस ठाणे क्रांती चौक औरंगाबाद शहर येथील पोहेकॉ रमेशलाल रामलाल जैस्वाल व पोहेकॉ गोपाल सोनवणे यांनी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.

सदरील तक्रारीवरुन 26 फेब्रुवारी रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लोकसेवक पोलीस कर्मचारी रमेशलाल जैस्वाल नेमणुक पोलीस ठाणे क्रांती चौक औरंगाबाद यांनी स्वतः पंचासमक्ष लाच स्वीकारली असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथील पथकाने मंठा गाव ते पंचायत समिती मंठा रोडवर रंगेहाथ पकडले आहे. पोहेकॉ रमेशलाल जैस्वाल व गोपाल सोनवणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.