बेगमपुरा स्मशानभूमीतून होऊ शकतो कोरोना संसर्ग परिसराला आले उकीरड्याचे स्वरुप....

Foto
 बेगमपुरा भागातील हिंदु स्मशान भूमीची अवस्था अतिशय खराब झालेली आहे.विखुरलेला कचरा, वापरलेले मास्क, कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर फेकलेले साहित्य पसरलेले आहे. यामुळे हि स्मशान भूमीच ’ कोरोना हॉटस्पॉट ’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे मनपा प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी परिसरातून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना स्वच्छता राखण्याचे, मास्क वापरण्याचे नियम प्रशासनाने घालून दिले आहे. मात्र शहरातील मनपा स्मशान भूमीच सुरक्षित नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घाटी पासून अगदी जवळ असलेली बेगमपुर्‍यातील स्मशान भूमी.कोरोनाच्या काळात याठिकाणी दगावलेल्या अनेक कोरोना बाधितांवर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र कोरोना बाधितांवर संस्कार केल्यानंतर  स्मशान भूमीचे निर्जंतुकीकरण केले गेले नाही. यामुळे इतर सामान्य आजाराने,वृद्धपकाळाने मृत पावलेल्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना देखील धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी बेगमपुरा, जयसिंगपुरा,पहाडसिंगपुरा, गुरुगणेशनगर टाऊन हॉल, भीमनगर या भागातील नागरिक अंत्यविधी करण्यासाठी येतात. सरासरी याठिकाणी दररोज 1 ते 2 मृतदेह येतात. या मुळे या परिसरात येणार्‍या सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.
कोरोनाबाधितांचे साहित्य, कचरा विखुरलेला
याठिकाणी मृत कोरोनाबाधितांवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. मात्र मास्क, फेसशिल्ड इतर काही साहित्यांची विल्हेवाट न लावता ते याठिकाणीच टाकण्यात आले आहे. यामुळे स्मशान भूमीत येणार्‍या नागरिकांना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपाने याठिकाणी साचलेला कचरा देखील उचललेला नाही.  या स्मशान भूमीमध्ये कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यात येतात. इतर सर्वसाधारण आजाराने मृत झालेल्यांना देखील याठिकाणी आणतात. त्यामुळे सदर स्मशान भूमीचे निर्जंतुकीकरण होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाने याबाबत दुर्लक्ष केले. त्यानंतर येथील समाजसेवक अमोल झळके या तरुणाने पुढाकार घेत स्वत: स्वखर्चाने संपूर्ण स्मशान भूमीचे निर्जंतुकीकरण केले.
मोकाट कुत्र्यांच्या तोंडात वैद्यकीय साहित्य
प्राण्यांनाही कोरोना होऊ शकतो प्राण्यापासून तो मानवापर्यंत पोहोचतो. मात्र या स्मशानभूमीत फेकलेला वैद्यकीय कचरा परिसरात असलेले मोकाट कुत्रे तोंडात घेऊन फिरतात.आणि हेच कुत्रे नंतर आजूबाजूच्या नागरी वसाहतीत फिरतात नागरिकांच्या संपर्कात येतात यामुळे कोरोनाच्या संकट परिसरात अजून गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker