काँग्रेसला चांगले दिवस येण्याची पडताहेत स्वप्न

Foto
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यातील दलित आणि मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीकडे वळला होता. पण विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने वंचित व एमआयएमकडे आकर्षित झालेला मतदार काँग्रेसकडे वळला. आता वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची हवा कमी झालेली आहे. त्याचा लाभ काँग्रेसला महानगरपालिका निवडणुकीत होईल, अशी दिवास्वप्ने काँग्रेसच्या मंडळींना पडत आहेत.
वर्षभरापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी एमआयएमचे अध्यक्ष बॅ. असोदोद्दीन ओवेसी व वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत युती केली. या युतीला लोकसभा निवडणुकीत 40 लाख मते मिळाली व एमआयएमचा एक खासदार निवडून आला. वंचितला मात्र युतीला लाभ झाला नाही. त्यामुळे विधानसभेत ही युती संपुष्टात आली. युती संपुष्टात आल्याने वंचितला फक्‍त 20 लाख मते मिळाली. सहा महिन्यात 50 टक्के मतदार पक्षापासून दुरावले. तसेच एमआयएमलाही यश मिळाले नाही. फक्‍त एका जागेवर समाधान मानावे लागले. औरंगाबाद जिल्ह्यात एक खासदार असतानाही 9 विधानसभा पैकी एकाही जागेवर एमआयएमला यश मिळाले नाही. वंचितच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.  या दोन्ही पक्षावरील विश्‍वास कमी झाला. आता काँग्रेस पक्ष राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षापासून दूरावलेला दलित आणि मुस्लिम समाज पुन्हा पक्षाकडे वळेल. त्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी दिवास्वप्ने काँग्रेसची मंडळी पहात आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने दलित व मुस्लिम मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वॉर्ड निहाय विविध कार्यक्रम राबविण्याचे प्रयत्न आता सुरू केले आहेत. काँग्रेसपासून दुरावलेला व काँग्रेस पक्षाचा प्रमुख आधार असलेला दलित, मुस्लिम मतदार पुन्हा काँगे्रसकडे वळेल का हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने चांगले निर्णय घेतले तर काही प्रमाणात मतदार काँग्रेसकडे वळेल असे दिसते. एमआयएमचे 25 नगरसेवक 2015 मध्ये निवडून आले होते. त्या जागा पुन्हा निवडून आणण्याचे आव्हान एमआयएम पुढे आहे.  वंचितचा एकही नगरसेवक सध्या नाही. त्यामुळे आता किती नगरसेवक ते पक्षाकडून निवडून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker