आडूळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम
पैठण, (प्रतिनिधी): रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धना सोबतच देशभक्ती आणि कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा अभिनव उपक्रम गुरुवारी आडूळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत राबविण्यात आला. मुख्याध्यापिका ज्योती मादनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत पर्यावरणपूरक राख्या बनविण्याची कार्यशाळा उत्साहात घेण्यात आली.
या कार्यशाळेत विद्यार्थिनींसोबत विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध साहित्याचा वापर करून आकर्षक
आणि पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या. पारंपरिक राख्यांपेक्षा नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून राख्या तयार करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या भावंडांसाठी राख्या तयार न करता देशासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रमही हाती घेतला. तसेच भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राख्या व शुभेच्छापत्रे पाठवून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्याध्यापिका ज्योती मादनकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा सण केवळ बहिण भावाच्या प्रेमापुरता मर्यादित न राहता पर्यावरणप्रेम, देशभक्ती आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा ठरला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील महिला शिक्षक प्रेरणा चौधरी, मनिषा मार्कंडेय, रत्नमाला अंकमवार, रश्मी कर्डीले यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने राख्या व शुभेच्छापत्रे तयार केली. राखी पर्यावरणाची, भावना देशसेवेचीफ असा सुंदर संदेश देणारा पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.















