मराठा आरक्षणाबाबत तातडीची बैठक घ्या; १८ एप्रिलपासून 'क्रांती चौकात' आंदोलन

Foto
गंगापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने बैठक आयोजित करावी, अन्यथा येत्या १८ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. 

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर मराठा समन्वयक योगेश शेळके (धामोरीकर), सुनील कोटकर, निलेश डव्हळे , प्रशांत पाटील, सोमनाथ मनाळ, विठ्ठल कुंजर आर्दीच्या स्वाक्षर्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या विविध प्रश्नांचा सखोल आढावा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसांत विभागीय आयुक्त कार्यालयात अध्यक्ष व सदस्यांसमवेत संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 

तसेच सारथी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या योजना पुन्हा सुरू कराव्यात, नव्या योजनांचा समावेश करावा आणि आझाद मैदानावरील आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जातप्रमाणपत्र वितरणातील अडचणी, आकडेवारीतील तफावत, एकाच कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळे निकष लावून प्रमाणपत्र नाकारण्याच्या तक्रारी याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

तसेच आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज व व्याज परतफेड प्रक्रियेत होणार्या विलंबामुळे युवकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मराठा आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलकांच्या
कुटुंबीयांना मदत करावी तसेच आत्महत्या केलेल्या कार्यकत्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य द्यावे, अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.

 हैदराबाद गॅझेट संदर्भात स्पष्टता नसल्याने समाजात संभ्रम व तणाव निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, जातीय तणाव वाढत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपसमिती व समाज प्रतिनिधींमध्ये दरमहा संयुक्त बैठकीचे नियोजन करावे, तसेच शिंदे समितीच्या कामाची व जातप्रमाणपत्रांची संपूर्ण माहिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.