नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती कायम

Foto
 गोदावरीसह उपनद्यांनाही पूर, लाखो हेक्टरमधील पिके धोक्यात
 गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेला पाऊस, जायकवाडीसह माजलगाव धरणासह इतर बंधार्‍यातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीचे पात्र फुगले असून खाली नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती आज सलग चौथ्या दिवशीही कायम होती. जायकवाडीतून 66024 क्युसेकने गोदावरीत विसर्ग केला जात आहे. तर इसापूर धरणातूनही विसर्ग सुरूच असल्याने नांदेड जिल्ह्यातून वाहणार्‍या पैनगंगेलाही पूर आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात एकट्या नांदेड जिल्ह्यातच सध्या अधिक प्रमाणात पूरस्थिती पहावयास मिळत आहे.
चार दिवसांनंतरही नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती जैसे थे आहे. प्रकल्पांतून पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांना आलेला पूर कायम आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गोदावरीलवरील विष्णुपुरी बंधार्‍याचे 10 दरवाजे रविवारी उघडण्यात आले. त्या दहाही दरवाजांतून मंगळवारी 29.70 क्युमेक विसर्ग सुरूच आहे. तर जायकवाडीच्या 18 दरवाजांमधून 66 हजार 024 क्युसेक विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर कायम आहे. या शिवाय आमदुरा बंधार्‍याचे 15, बळेगावचे 16 आणि बाभळीचे 14 दरवाजे उघडले आहेत. 
इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून 36.71 दलघमी पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे. सतत पडणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे नांदेड, देगलूर, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यांत शेतात पाणी शिरले आहे. शेतात पाणी साचल्याने कापणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला कोंबे फुटली आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 
हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी पहाटे धुवाधार पाऊस झाला. हिंगोली मंडळात 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. येलदरी धरण 100 टक्के भरले असून मंगळवारी सकाळी 805.042 दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास धरणाच्या बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे 9 दरवाजे तीस सेंटीमीटरने उचलून दहा हजार 680 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker