शिवथाळीपासून ३०० हुन अधिक नागरिक वंचित, शहरातील चार केंद्रातून दुप्पट मागणी

Foto
औरंगाबाद  :-  दहा रुपयात थाळी या ठाकरे सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरात घाटी, मध्यवर्ती बस स्थानक, मिनी घाटी व टी. व्ही. सेंटर येथे अशी चार शिवभोजन केंद्रे आहेत. येथील सर्वच केंद्रात असलेल्या थाळीपेक्षा दुप्पट थाळी असाव्यात, अशी मागणी सर्वच केंद्राचालक करत आहेत. घाटी व मध्यवर्ती बस स्थानक येथे दीडशे तर मिनी घाटी येथे सव्वाशे व टी. व्ही. सेंटर येथील केंद्रावर ७५ थाळ्या उपलब्ध आहेत. या थाळ्या एक वाजेपर्यंत किंवा फार उशीर तर दीड वाजेपर्यंत संपून जात आहेत.

गरिबांना होतोय लाभ
रोज शहरात ५०० गरजू या थाळीचा लाभ घेत आहेत. थाळी मध्ये दोन चपाती, भाजी, एक वाटी भात, एक वाटी डाळ उपलब्ध असते. भिकारी सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत. उपलब्ध असलेली थाळी रुचकर असल्याची भावना लाभार्थ्यांनी बोलून दाखविली.

काहीवेळा ऍप मध्ये येतात अडचणी
फार कमी वेळा ऍप मध्ये काही अडचणी येतात पण त्या काही मिनीटमध्ये दूर होऊन जातात. मात्र रोज दीडशे फोटो काढणे व्यवहार्य नसल्याचे मत नागरिक व केंद्रचालक बोलत होते. त्यासाठी पर्यायी व्यवस्था असावी, अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे.

दीडशे थाळ्या या एक वाजेपर्यंत संपून जातात, रोज दीडशेहुन अधिक लोक माघारी पाठवावे लागतात. अधिक थाळ्या दिल्या तर अनेकांच्या गरजा पूर्ण होतील. - राजेश भैरव, घाटी शिवभोजन केंद्रचालक

ऍप ऐवजी पर्यायी थंब मशिन उपलब्ध झाल्यास योजनेला अधिक गती प्राप्त होईल. रोज अधिक लोकांना याचा लाभ मिळायला हवा असे वाटते. - भुपेंद्रसिंह मल्होत्रा, मध्यवर्ती बसस्थानक केंद्रचालक