औरंगाबाद- अवर्षण आणि दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या औरंगाबादसह मराठवाड्याला शेतकरी आत्महत्येचा जणू शापच लागला असून संपूर्ण मराठवाड्यात आत्महत्यांचा वेग वाढताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तर परिस्थिती अधिकच भयंकर आहे. दर तिसऱ्या दिवशी शेतकरी आपले आयुष्य संपवत असल्याचे भीषण वास्तव आकडेवरीतून समोर आले आहे.
गेल्या १० महिन्यांमध्ये तब्बल
११४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून लहरी पावसाने शेती
उदध्वस्त झाली आहे. सततचा दुष्काळ आणि नगदी पिकावर झालेले रोगांचे हल्ले
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत आहे. हजारो रुपये शेती मशागतीसाठी खर्च
करुन नफा तर सोडाच, पण झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर
कर्जाचा बोजा वाढला आहे.
बँकांचे कर्ज, सावकारांचे
कर्ज यासह कुटुंबाच्या पालनपोषणासाठी लागणारा खर्च याचा ताण सहन न झाल्याने अनेक
शेतकरी आत्महत्या करुन जीवन संपवत असल्याचे दिसते. यंदा १ जानेवारीपासून ते
आतापर्यंत गेल्या दहा महिन्यांच्या काळात ११४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.
नोव्हेंबर महिन्यानंतर आत्महत्येची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते. या महिन्यात
आतापर्यंत १५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी दिली तरी
शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरुन दिसून येते. त्यामुळे
कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी होत
आहे.












