▶ धनादेश अनादरणः आरोपीस १ महिना सश्रम कारावास
▶ १ लाख १५ हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश
वैजापूर, (प्रतिनिधी): फिर्यादी मयूर भगवान रत्नपारखी यांचे कडून हात उसने घेतलेली रक्कम व म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस १ महिना सश्रम कारावास तसेच रूपये १ लाख १५ हजार रुपये नुकसान भरपाई फिर्यादी मयूर भगवान रत्नपारखीला द्यावी, रक्कम नाही भरल्यास अतिरिक्त ६ दिवस साध्या कारावासाची शिक्षा असे आदेश अतिरिक मुख्य न्याय न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ साहेब यांनी दिले.
वैजापूर येथील रहिवाशी मयूर भगवान रत्नपारखी यांचे कडून आरोपी अशोक हिरालाल पंडित (वय: ३४ वर्ष रा. मुक्काम आघुर ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी डिजिटल कॅमेरा साठी फिर्यादी मित्राकडून हात उसने रुपये एक लाख रुपये सहा महिन्याच्या परतफेडी च्या वायद्यावर घेतले होते. फिर्यादी व आरोपीचे मित्रत्वाचे व घनिष्ठ संबंध असल्यामुळे फिर्यादीने आरोपीस व्यवसाय कामी डिजिटल कॅमेरा घेण्यासाठी हात उसने सहा महिन्याचा परत फेडीवर एक लाख रुपये १ डिसेंबर २०२४ रोजी दिले. असे की, हात उसने घेतलेल्या रकमेची ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे फिर्यादिने आरोपीकडे सदर रकमेची मागणी केली.
तेंव्हा आरोपीने फिर्यादी मयूर भगवान रत्नपारखीच्या नावाने दि. २५ जून २०२५ रोजीचा रक्कम रूपये १ लाखचा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वैजापूर चा धनादेश दिला. सदरचा धनादेश फर्यादिने त्याचे खाता असलेली बंधन बँक लिमिटेड, शाखा वैजापूर ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे वटविण्यासाठी टाकला. परंतु पुरेशा रकमेअभावी आरोपीने दिलेला धनादेश न वटता अनादरित होऊन दिनाक ०४ जुलै २०२५ रोजी परत आला.
धनादेश न वटता अनादरित होऊन परत आल्यानंतर फिर्यादिने आरोपीस मजहर बेग यांचा मार्फत दिनाक ०९ जुलै २०२५ रोजी नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले होते. परंतु. आरोपीस दिनाक १७ जुलै २०२५ रोजी नोटीस प्राप्त होऊन देखील आरोपीने धनदेशाची रक्कम मुदतीत जमा केली नाही.
त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध दिनाक ७ऑगस्ट २०२५ रोजी वैजापूर येथील न्यायालयात धाव घेऊन अॅड. मजहर करीम बेग यांचेमार्फत चलनक्षम दस्तावेज कायदा १८८१ चे कलम १३८ नुसार ईफायलिंग द्वारे फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील परिपूर्ण फिर्याद, साक्षी पुरावा व फिर्यादी चे वकील मजहर करीम बेग केलेल्या प्रभावी युक्तिवादाचा आधारावर न्यायालयाने आरोपीस २५ मे २०२६ रोजी वरीलप्रमाणे दणका देत निकाल दिला. सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे अॅड. मजहर करीम बेग यांनी काम पाहिले.















