छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ओलेक्ट्रा कंपनीकडून मागविण्यात आलेल्या ३५ ई-बसपैकी अखेर १० बस महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या. बसपुरवठ्यात सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे महापालिकेने करार रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीने हालचाली गतिमान केल्या.
२४ बसेस पुढील दोन आठवड्यांत मिळणार असून, १७ सप्टेंबरला ३४ बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याची माहिती बुधवारी (दि.१९) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांना दिली.
द
वाढती वाहतूक आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन स्मार्ट सिटी प्रशासनाने इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी हैदराबादस्थित ओलेक्ट्रा कंपनीसोबत ३५ ई-बसचा करार करण्यात आला. करारानंतर कंपनीने सुरुवातीला केवळ एक बस उपलब्ध करून दिली. वातानुकूलित ई-बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर उर्वरित बस तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष बस देण्याऐवजी कंपनीकडून दोन वर्षे आश्वासनेच मिळत राहिली.
दरम्यान, स्मार्ट सिटी प्रशासनाची मुदत संपल्यानंतर शहर बससेवेची जबाबदारी महापालिकेकडे आली. प्रलंबित ई-बस मिळविण्यासाठी मनपानेही कंपनीकडे पाठपुरावा सुरू ठेवला.
वारंवार प्रयत्न करूनही बस उपलब्ध होत नसल्याने अखेर महापालिकेने करार रद्द करण्याचा इशारा दिला. त्यानंतर कंपनीकडून बुधवारी १० बस महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. दाखल झालेल्या १० बसची सध्या पासिंग प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. उर्वरित २४ बस प्राप्त झाल्यानंतर एकूण ३४ ई-बस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे नियोजन आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













