विजेची तार तुटल्याने १०० मेंढ्यांचा मृत्यू ; जैतापूर येथील मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान

Foto

औरंगाबाद: कन्‍नड तालुक्यातील जैतापूर शिवारातील गट नंबर २९६  मधील शेतात विजेची तार तुटल्याने  शॉक लागून शंभरच्यावर मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना  शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेत मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

अंबादास शिंगाडे, सुखदेव आयनर, सदाभाऊ शिंदे, यमाभाऊ शिंदे, संजू शिंगाडे (रा. वाकला, ता. वैजापूर) या पाच मेंढपाळांच्या शंभराहून अधिक मेंढ्या दुर्घटनेत दगावल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मेंढपाळ दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर कन्‍नड तालुक्यात मेंढ्या घेऊन जात असतात. यावर्षीही ते आपल्या मेंढ्या घेऊन कन्‍नड तालुक्यात गेले होते. शुक्रवारी रात्री त्यांनी जैतापूर शिवारातील ज्ञानेश्‍वर झाल्टे यांच्या शेतात मेंढ्या बांधल्या होत्या. त्यावेळी मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटली आणि मेंढ्यांच्या अंगावरून घासत गेली. यामुळे शंभरच्यावर मेंढ्या विजेच्या धक्क्याने जागीच मृत्युमुखी पडल्या. विद्युत तार घासत गेल्यामुळे जाळ लागला. त्यामुळे मेंढपाळांना जाग आली. समोरचे दृश्य पाहून त्यांना काही समजेनासे झाले होते. त्यांनी लाकडाने तारेला बाजूला करत काही मेंढ्यांना त्या ठिकाणाहून मोकळे केले. मेलेल्या मेंढ्यांमध्ये ८० मेंढ्या गाभण होत्या तर वीस बोकडाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेत जवळपास दहा लाख रुपयांच्या वर मेंढपाळांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कन्‍नड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती कन्‍नडच्या तहसीलदारांना कळवली असता त्यांनी तातडीने मंडळ अधिकार्‍याला घटनास्थळी पाठवत पंचनामा करण्याचे आदेश दिले. आज सकाळी महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी लोंबकळलेल्या तारा व तुटलेल्या तारा बाजूला केल्या. मेंढपाळांनी नुकसान भरपाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.

अनेक ठिकाणी लोंबकळत आहेत तारा 
जैतापूर परिसरातून मुख्य विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. बर्‍याच ठिकाणी या तारा धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत. काही ठिकाणी खांब वाकल्यामुळे विद्युत तारा माणसाच्या हाताला लागून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. शेतकर्‍यांनी वारंवार महावितरणकडे लोंबकळलेल्या तारांची दुरुस्ती करण्याची मागणी करूनही महावितरण याकडे लक्ष देत नाही. आता तरी महावितरणने याकडे लक्ष देऊन लोंबकळणार्‍या तारा व वाकलेले खांब यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.