औरंगाबाद : उन्हाचा पारा जसजसा वाढत चालला आहे, तसतसे शहरात विविध ठिकाणी आगीच्या घटनेतही वाढ होत आहे. यंदा जानेवारी ते 30 मे अखेरपर्यंत शहरात तब्बल 351 ठिकाणी आग लागली. त्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती मनपा अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी लालचंद गायकवाड यांनी दैनिक ‘सांजवार्ता’शी बोलताना दिली.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यातच शहरात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. कचर्याच्या ढिगांमुळे सर्वाधिक आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. आधीच उन्हाचा वाढता पारा आणि त्यात पुन्हा जागोजागी कचरा अशी परिस्थिती शहरात दिसून येत आहे. कचर्याच्या ढिगाला आग लागण्याच्या घटनांमध्ये भर पडत आहे. त्यामुळे अनेकांना नुकसानही सोसावे लागत आहे.
जानेवारी ते मेअखेर ३५१ आगीच्या घटना
शहरामध्ये आगीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात वाढते तापमान, कचर्याचे ढिगारे आणि शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते मे अखेरपर्यंत ३५१ आगीच्या घटना घडल्या असल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली आहे. जानेवारी महिन्यात तब्बल ६९ आगीच्या घटना घडल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात आगीचे प्रमाण थोडे कमी दिसून आले. या महिन्यात ५४ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. मार्च महिन्यापासून उन्हाचा पारा हळूहळू वाढत गेला. त्याचा परिणाम अनेक ठिकाणी आग लागल्या. मार्च महिन्यात ६७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. एप्रिल महिन्यात तर तब्बल शंभर ठिकाणीआगीच्या घटना घडल्या.तसेच चालू महिन्यात ३० मेपर्यंत ६१ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.
जानेवारी महिन्यात चिकलठाणा, मुकुंदवाडी, रामनगर परिसरात ११ आगीच्या घटना घडल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली आहे. तसेच पदमपुरा भागात २७ ठिकाणी तर सिडको-हडको भागात ३१ अशा एकूण ७९ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच फेब्रुवारीचा आकडा पाहता पदमपुरा भागात २४, सिडको-हडको २३ तसेच चिकलठाणा, मुकुंदवाडी आदी भागात ७ अशा एकूण ५४ आगीच्या घटना घडल्या. याशिवाय मार्च महिन्यात घडलेल्या ६७ आगीच्या घटनेत पदमपुरा भागात ३९, सिडको- हडको १७, चिकलठाणा, मुकुंदवाडी भागात १८ आगीच्या घटना घडल्या. एप्रिलमध्ये मात्र आगीच्या घटनेत वाढ झाली. पदमपुरा भागात ४९, सिडको-हडको २८, चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात २३ अशा एकूण १०० ठिकाणी आगी लागल्या. मेअखेर घडलेल्या ६१ आगीच्या घटनांमध्ये पदमपुरा भागात सर्वाधिक आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या भागात ३३ तर सिडको-हडकोत १६ आणि चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात बारा ठिकाणी आग लागल्याची नोंद केली गेली आहे.
कचर्यामुळेच सर्वाधिक ठिकाणी आग
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कचरा कुठेही रस्त्यावर फेकला जातो. त्यामुळे कचर्याच्या ढिगार्याला आग लागते. कचर्यामुळे आग लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, असेही आवाहन अग्निशमन अधिकारी लालचंद गायकवाड यांनी केले.