औरंगाबाद : सत्तेत राहूनही गेली चार वर्ष एकमेकांच्या नावाने घसा कोरडा पडेपर्यंत शिव्याशाप घालणारी सेना भाजपची मंडळी केवळ निवडणुकीपुरतीच एकत्र आली का ? असा प्रश्न पडला आहे. याचे कारण म्हणजे शहरात लागलेले भाजपचे पोस्टर्स !
गेल्या निवडणुकीत युती नसताना शहरभर भाजपने प्रचंड पोस्टरबाजी केली होती. ’अब की बार मोदी सरकार’ म्हणून भाजपने कमळाच्या निशाणीचे बटन दाबा, असा प्रचार जोरात केला. यावेळी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीतही भाजपची शतप्रतिशत चाल लपून राहिलेली नाही. हर हर मोदी घर घर मोदी म्हणत प्रत्येक घरात भाजप कमळाचा प्रचार करत आहे. औरंगाबादची जागा युतीमध्ये सेनेच्या वाट्याला आहे. खरेतर भाजपने धनुष्यबाणाचे बटन दाबा, असे आवाहन करीत पोस्टरबाजी करायला हवी. मात्र शतप्रतिशत भाजप हे ब्रीद वाक्य मनात बिंबलेल्या शहरातील नेत्यांनी फिर एक बार मोदी सरकार आणि कमल का बटन दबाओ, अशा आशयाचे पोस्टर्स शहरात झळकावले आहेत. या पोस्टरने सेनेचे मतदार मात्र संभ्रमात आहेत, भाजप दगाबाजी तर करणार नाही ना ? असा सवाल कार्यकर्ते विचारतात. निवडणुकीच्या धामधुमीत भाजप नेत्यांनी इतर जिल्ह्यात प्रचाराला जाणे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन प्रचार न करणे, या बाबीही खटकत आहेत.
मतदार शोधतील कमळाचे चिन्ह?
भाजपच्या घोषणेनुसार कमळाचे बटन दाबण्यासाठी जेव्हा मतदार ईव्हीएम मशीन समोर जातील तेव्हा त्यांना कमळाचे चिन्ह दिसेल का ? हा खरा प्रश्न आहे. ईव्हीएमवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह असेल. मग भाजपच्या प्रचाराचा अर्थ काय ? असाही प्रश्न सहजच पडतो. प्रादेशिक पक्षांना तुच्छ लेखण्याचा राष्ट्रीय पक्षांचा हेतू लपून राहिलेला नाही. भाजप तर यात वाकबदार आहे. त्यामुळे हा शेरा इशारा सेनेला तर नाही ना ? अशीही चर्चा होत आहे.