मालमत्ता कर शास्तीवर १०० टक्के माफी

Foto

सांजवार्ता

Dace 05/11/2026

मनपाची सर्वसाधारण सभेत घोषणा : सवलत ३१ डिसेंबरपर्यंत

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) महापालिकेने शहरातील मालमत्ता करधारकांसाठी आणखी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील शास्तीमध्ये (दंड) १०० टक्के सूट देण्याची घोषणा महापौर समीर राजूरकर यांनी बुधवारी (दि. ४) सर्वसाधारण सभेत केली. ही सवलत योजना धनत्रयोदशीपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार असून, याचा लाभ घेण्यासाठी करधारकांना आपली संपूर्ण थकबाकी एकरकमी जमा करावी लागणार आहे.

शहरातील ३ लाख २५ हजार मालमत्तांची नोंद असून १ लाख ७८ हजार थकबाकीदारांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यापैकी १ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांकडे कर थकीत असून, चालू मागणीसह ही रक्कम १ हजार २५६ कोटींवर

पोहोचली आहे. यामध्ये ३०० ते ३२५ कोटी रुपये केवळ शास्तीचे आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने शास्तीमाफीचा निर्णय घेतला आहे.

एकरकमी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्यांची शास्ती पूर्णपणे माफ केली जाईल, असे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. ३१ डिसेंबरनंतर योजनेला मुदतवाढ मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळातही 'शास्ती से मुक्ती' अभियान राबविण्यात आले होते. शास्तीत सवलत दिलेल्या या मोहिमेत ५६ हजार मालमत्ताधारकांनी सहभाग घेतला आणि महापालिकेला १०० कोटींचा महसूल मिळाला होता. ३१ डिसेंबरनंतर मुदतवाढीची मागणी करणार नाही, असा शब्दही त्यांनी गटनेत्यांकडून घेतला.

शास्तीचा लाभ एकरकमी भरणाऱ्यांनाच

महापालिकेच्या १ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांकडे १ हजार २५६ कोटींची थकबाकी आहे. त्यातील ३०० ते ३२५ कोटी रुपये शास्तीचे आहेत. संपूर्ण थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांनाच १०० टक्के शास्तीमाफी मिळणार आहे. ३१ डिसेंबर ही योजनेची अंतिम मुदत आहे.

पदवीधर मतदार संघाची आचार संहिता संपल्यानंतर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. (छायाः सचिन भंडारे)

नळजोडणीसाठी लागणार ८ हजार : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरापर्यंत नळ जोडण्यासाठी नागरिकांना एकूण ८

हजार २५ रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये अर्धा इंच नळजोडणीचे ६ हजार रुपये शुल्क आणि वर्षाची २ हजार २५ रुपये पाणीपट्टी यांचा समावेश असून, ही रक्कम एकाच वेळी भरणे बंधनकारक आहे. सातारा-देवळाईसह शहरातील १४ नो नेटवर्क झोनमध्ये ही आकारणी लागू करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. नगरसेवकांनी हे जोडणी शुल्क निम्मे करण्याची मागणी केली होती; मात्र प्रशासनाने ती फेटाळून लावली. आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, प्लंबर खर्च १,८०० रुपये आणि साहित्य, अर्ज व रस्ता दुरुस्ती शुल्क ४,२०० रुपये मिळून ६ हजार रुपये निश्चित केले आहेत. दरम्यान, रस्ता खोदावा लागत नसल्यास रस्ता दुरुस्ती शुल्क आकारू नये, अशी मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केली.

https://epaper.san Powered By: Vrudhee Solutions