दहावी- बारावी बोर्ड परीक्षा: आता अर्ज भरणे प्रकिया वीस दिवस आधीच होणार बंद

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो):  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून परीक्षा होण्याच्या २० दिवस आधीच अर्ज भरणे प्रकिया पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय मंडळ अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी बोर्ड परीक्षा १० फेब्रुवारीपासून बारावीची तर २० फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. त्यासाठी बोर्डाच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. परीक्षा मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गत काही वर्षांत परीक्षा अर्जांची उशिरा येणारी नोंद, बनावट दस्तावेज सादर करणे, चुकीची माहिती देऊन अंतिम क्षणी अर्ज भरण्याचे प्रकार, तसेच मुक्त व थेट प्रवेशातून गैरप्रकार वाढल्याचे आढळले होते. या सर्वांमुळे परीक्षेचे वेळापत्रक, तपासणी व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते. काही प्रकरणांमध्ये दस्तावेज पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक वेळेवर तयार होत नव्हते. दहावीची वाढीव शुल्कसहीत आवेदन पत्र भरण्यासाठी ३० जानेवारीपर्यत मुदत देण्यात आली आहे. बारावीची २१ जानेवारीपर्यत आवेदनपत्र भरण्याची मुदत देण्यात आली आहेत. 

विद्यार्थ्यांनी वेळेवर आवेदनपत्र भरावेत: अनिल साबळे

बोर्डाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावी परीक्षेसाठी सध्या तयारी सुरू झाली आहे. आवेदन पत्र आतापर्यंत परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यत भरले जात होते. परंतु आता यंदा तसे होणार नाही. शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षा आवेदन पत्रे भरून घेतले जाणार नाही. आता २० दिवस अगोदर बंद होणार. शिवाय विलंब झाल्यास तारखा निहाय किती फी द्यावी लागणार याची पण सविस्तर माहिती जाहीर केली आहे. असे विभागीय मंडळ अध्यक्ष अनिल साबळे यांनी स्पष्ट केले.