एसआयटीकडे जमिनींसंदर्भात १२० तक्रारी दाखल

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्ह्यातील जमिनींसंदर्भातील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) १२० तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, प्राप्त सर्व अर्ज जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांकडे पाठविण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक अहवाल व स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याचे निर्दे शही दिले आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गटक्रमांक ३० मधील जमिनीच्या
गैरव्यवहाराबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्ह्यातील तक्रारींच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी करत एसआयटी गठीत केली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील या पथकात पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक, नोंदणी उपमहानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions