प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्या; १३ मुलांना विषबाधा, रुग्णालयात दाखल

Foto
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या उत्साहात गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कापूस वडगाव येथे ही घटना घडली. विषबाधेची लक्षणं जाणवू लागल्यानंतर सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार १७ सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने गावातील काही मुलांनी परिसरात एकत्र येत मातीचा गणपती बसवला. त्यानंतर मुलांनी गणपतीची आरती केली. आरतीनंतर मुलांकडे प्रसादासाठी कोणताही खाद्यपदार्थ उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या एरंडाच्या बिया प्रसाद म्हणून खाल्ल्या.

एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलांना त्रास जाणवू लागला. त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली, तसंच अस्वस्थताही जाणवू लागली. एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने परिसरात चिंता निर्माण झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तातडीने सर्व मुलांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून मुलांवर उपचार सुरू करण्यात आले. एकाच घटनेत १३ मुलांना त्रास झाल्याने वैद्यकीय यंत्रणेकडूनही आवश्यक काळजी घेतली जात आहे. सुदैवाने उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात लहान मुलांनी परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही बिया, फळे किंवा इतर पदार्थ प्रसाद म्हणून खाण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः लहान मुलांना कोणतीही अनोळखी वनस्पती, बिया किंवा फळे खाण्यास देऊ नयेत, अशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अनोळखी बिया किंवा वनस्पतींचे भाग खाद्य आहेत की नाहीत, याची माहिती नसताना ते खाणं धोकादायक ठरू शकतं. गणपतीची आरती आणि त्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा झाल्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या सर्व मुलांवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.