पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील काळेपडळ भागात तीन तर हडपसर भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे याने तयार केली होती. ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्ये विकली गेल्याचे समोर आले आहे.
दरम्यान दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातील दारू प्राशन केलेल्या काही जणांचा तोंडाला फेस येऊन मृत्यू झाल्याची माहिती आहे. योगेश वानखेडे हा दारू विक्रेता असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह आठ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
योगेश वानखेडेसह आठ जण अटकेत
दरम्यान, या प्रकरणातील योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून, यापूर्वीही त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने पुरवठा केलेली विषारी दारू पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत कर्नलसिंह विरखा नावाचा व्यक्ती आपल्या दारू गुत्त्यावर विकत होता. पोलिसांनी कारवाई करत योगेश वानखेडे, कर्नलसिंह विरखा आणि त्याच्या नातेवाईकांसह आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. दरम्यान, फुगेवाडीतील या दारू गुत्त्याच्या बाहेर स्थानिक नागरिकांचा आणि महिलांचा मोठा रोष पाहायला मिळत असून सध्या तिथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.