थिरुअनंतपुरम : केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील करुवट्टा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षांच्या मुलीवर तिच्या ६५ वर्षीय आजोबांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने तीन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हे केलं. सोनं आणि पैसे लुटून महागडे गॅजेट्स आणि बाईक खरेदी करण्याची त्यांची इच्छा असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे.
हरिपाड ब्लॉक पंचायत परिसरातील करुवट्टा येथील एका भाड्याच्या घरात ६५ वर्षीय शिवनकुट्टी चेट्टियार यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर पोलिसांनी मुलीची कसून चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. शनिवारी रात्री ही हत्या करण्यात आली. त्यावेळी चेट्टियार यांची पत्नी आणि मुलगी रुग्णालयात गेल्या होत्या, त्यामुळे ते घरी एकटेच होते. तपासात असं दिसून आलं की, मुलीने हत्येसाठी हीच रात्र निवडली आणि कोल्लमवरून येणार्या तिच्या मित्रांना घराचा पत्ता दिला.
मुलीनेच रचला हत्येचा कट
तिन्ही अल्पवयीन मुलं रात्री ९ वाजल्यानंतर घरी पोहोचली, आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी आधीच तयारी केली होती आणि सोबत मोबाईलही आणला नव्हता. सोमवारी सकाळी मृतदेह सापडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तपासाला नवीन वळण मिळाले. ती मुलगीही तिथेच हजर होती आणि रक्ताने माखलेल्या वातावरणातही ती पुन्हा पुन्हा सांगत होती की तिला परीक्षा देण्यासाठी शाळेत जायचं आहे. तिचं वर्तन आणि शांत स्वभाव पाहून तपास अधिकार्यांना संशय आला. यानंतर एका इन्स्पेक्टरने तिची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान मुलीने हत्येचा कट रचल्याचं सांगितलं.
चादरी अन् कपड्याने बांधले हात-पाय
तपासानुसार, आधी नातेवाईकाचे हात आणि पाय चादर आणि कपड्याने बांधण्यात आले. यानंतर त्यांच्या गळ्याभोवती कपडा घट्ट आवळण्यात आला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींनी बेडरूममधील कपाट तोडून तेथून सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. मुलीला महागडा आयफोन आणि मुलांना बाईक खरेदी करायची असल्याने त्यांनी हा कट रचला. तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी हत्येनंतर घरातील फरशीवर आणि दरवाजांजवळ मिरची पूड टाकली होती.