औरंगाबाद: पावसाळ्याला प्रारंभ होताच आरोग्याशी निगडित अनेक आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. असून गेल्या महिन्यात तब्बल १३८ रुग्ण डायरीयाने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. या बरोबरच सर्दी खोकल्याचे साडेतीनशे, डेंग्यूचे देखील ५ पॉझिटिव्ह तर २ संशयित रुग्ण आढळल्याने डेंग्यू फोफावण्याची शक्यता नाकारता येत नसताना मनपाचा आरोग्य विभाग केवळ कागदी नियोजन करत असल्याचे दिसते.
पावसाळा सुरू होताच जागोजागी साचलेला कचरा कुजतो त्यामुळे दुर्गंधी सुटत वातावरण प्रदूषित होते तसेच यावर माशा व डास वाढल्याने साथ रोगाचे प्रमाण वाढते. याबाबत मनपा आरोग्य विभागाने प्रतिबंधासाठी अॅबेटींग, औषध फवारणी, धुर फवारणी करणे आवश्यक असताना आरोग्य विभाग मात्र कागदी नियोजनात दंग असल्याचे दिसते. यासंबंधी महापौर नंदकुमार घोडेले दोन दिवसांपूर्वीच घेतलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत जून महिन्यातच शहरात डेंग्यूचे ५ पॉझिटिव तर दोन संशयित सापडले आहेत. डायरियांच्या रूग्णांतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यात डायरियांच्या रूग्णांची संख्या ही ८० होती, ती आता १३८ वर पोहोचली आहे. सर्दी, खोकल्याच्या साथरोगानेही शहराला ग्रासले आहे. आजघडीला शहरात सर्दी, खोकल्याचे ३४५ रूग्ण आढळले आहेत. ही केवळ पालिकेकडून सादर करण्यात आलेली आकडेवारी आहे. प्रत्यक्षात या रूग्णांची संख्या याहीपेक्षा अधिक असण्याचा शक्यता नाकारता येत नाही. याकरिता प्रशासनाने वॉर्डावॉर्डात औषध फवारणी व धुर फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रत्येक ठिकाणी अशी धूर फवारणी किंवा औषध फवारणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
साथरोगांनी त्रस्त रूग्णांची संख्या
डेंग्यू पॉझिटिव्ह - ०५
डेग्यू संशयित - ०२
डायरियाचे रूग्ण - १३८
सर्दी, खोकला - ३४५