वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कापूस वाडगाव येथे गणपती बसविण्याचा खेळ खेळणाऱ्या १४ लहान मुलांना एरंडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
रात्रीच्या सुमारास मुलांना त्रास जाणवू लागल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व मुलांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. गावातील काही लहान मुले एकत्रितपणे गणपती बसविण्याचा खेळ खेळत होती.
खेळादरम्यान त्यांनी मातीचा गणपती तयार करून त्याची स्थापना केली. त्यानंतर मुलांनी गणपतीची आरती केली. आरती झाल्यानंतर त्यांनी महाप्रसाद म्हणून एरंडाच्या बिया एकमेकांना वाटल्या. या बिया मुलांनी खाल्ल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास जाणवू लागला. रात्री ९ वाजेच्या सुमारास मळमळ व उलट्याचा त्रास होऊन काही मुले बेशुद्ध पडली.
-- प्रकृती स्थिर असलेले मुले --
रोहिणी आव्हाड (१४), जयश्री आव्हाड (१८), खुशी आव्हाड (११), अंजली पवार (११), राधिका आव्हाड (१७), कैवल्या नांगरे (३), सुप्रिया त्रिभुवन (१४), साहिल आव्हाड (१८), कल्याणी आव्हाड (११), प्राची त्रिभुवन (११), आयुष त्रिभुवन (५), आर्यन त्रिभुवन (११), अनुप त्रिभुवन (९) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.














