आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या १४ जणांवर गुन्हे

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) शिवना, आमसरी आणि वाघेरा येथे वीज वाहिनीवर आकडे टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या १४ जणांविरुद्ध रविवारी (दि. ९) सकाळी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात १० वाजता
महावितरणच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणचे सहायक अभियंता युवराज जालम तायडे यांच्या पथकाने सोमवार ते शनिवार आठवडाभर व
शनिवारी दिवसभर गावोगावी छापे टाकून कारवाई करून ही वीजचोरी उघडकीस आणली. महावितरणच्या पथकाने शिवना, आमसरी आणि वाघेरा परिसरात तपासणी केली असता संबंधित वीज ग्राहकांकडून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आले. 

काही ग्राहकांनी लघुदाब वीज वाहिनीवर आकडे टाकून थेट वीज घेतली. तर काहीनी मीटरच्या इनकमिंग टर्मिनलला आऊटगोइंग टर्मिनलची वायर थेट जोडून वीजचोरी केल्याचे तपासणीत समोर आले. महावितरणच्या पथकाने कारवाई करून संबंधितांना वीजचोरीबाबत दंड प्रस्तावित केला. 

महावितरणच्या पथकाची कारवाई होता. मात्र, संबंधितांनी दंडाची रक्कम न भरल्याने महावितरणकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळ अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा अजिंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी सहायक अभियंता युवराज जालम तायडे (४८, रा. शिवना) यांनी फिर्याद दिली.

त्यावरून पोलिसांनी वीजचोरी करणाऱ्या मयूर दांडगे, गजानन सोनवणे, नारायण दांडगे (तिघे रा. आमसरी), सुनील डाईफोडे (रा. वडाळी), राजमल जाधव (रा. नाटवी), तुकाराम गंगाराम, युवराज बारोटे, विठ्ठल चोरमारे, सुधाकर जाधव, नामदेव काळे (सर्व रा. वाघेरा), तसेच रिजवान सय्यद, वसीमखान अय्युबखान, शेख नजीम आणि शेख मुख्तार शेख अहेमद (सर्व रा. शिवना) यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

महावितरणच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, वीजचोरीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे सहायक अभियंता युवराज तायडे यांनी सांगितले.