भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू; पुण्यातील कोंढवा येथील घटना; तिघांना ढिगार्‍याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश

Foto

पुणे : कोंढवा भागातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून  झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला़ अग्‍निशमन दलाला ढिगार्‍याखालून तीन जणांना जिवंत काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला व ४ मुलांचा समावेश आहे.

या दुर्घटनेतील मृतांची नावे अशी - आलोक शर्मा (वय २८),  मोहन शर्मा (वय २०), अजय शर्मा (वय १९), अभंग शर्मा  (वय १९), रवी शर्मा (वय १९), लक्ष्मीकांत सहानी (वय ३३), अवधेत सिंह (वय ३२), सुनील सिंग (वय ३५), ओवीदास (वय ६), सोनाली दास (वय २), विमा दास (वय २८), संगीता देवी (वय २६). हे सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत. या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर ते काम करत होते.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मृत मजूर इमारत बांधकामासाठी पुण्यात वास्तव्य करत होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारात ही दुर्दैवी घटना घडली. पोलिस, एनडीआरएफ आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. आणखी काही जण ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेबाबत बोलताना एनडीआरएफचे सच्चिदानंद गावडे यांनी सांगितले की, कोंढवा परिसरात असणार्‍या आल्कन स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या बाजूला दुसर्‍या एका इमारतीचे बांधकाम सुरू होते त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीत पार्किंगला असणार्‍या चार गाड्याही खाली कोसळल्या. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रथमदर्शनी या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचे दिसत आहे. मात्र, या घटनेची संपूर्ण चौकशी करू, असे त्यांनी सांगितलेे. पुण्यात सुरू असणार्‍या पावसाने इमारतीजवळील जमीन भुसभुशीत झाली त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.

दुर्घटनेची सखोल चौकशी करा : मुख्यमंत्री 
स पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून दुर्दैवी घटना घडली. यात १५ जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेला जबाबदार कोण यावरून प्रश्‍न निर्माण झालेला आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्‍त केली असून, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला़  आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. ४ फूट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजुरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करून बचाव कार्य करण्यात येत आहे.

सिंहगड येथे जॉगिंग ट्रॅक कोसळला 
स सिंहगड रस्त्यावरील वडगाव (बु.) येथील फनटाईम सिनेमागृह जवळील कॅनॉललगत मनपाने उभारलेला जॉगिंग ट्रॅक आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे मनपाने वडगाव (बु.) येथील कॅनॉल लगत नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम उभारले आहे. मात्र, भराव टाकून बनविलेली जॉगिंग ट्रॅकची भिंत कालपासून सलग सुरू असलेल्या पावसाने कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांनी पार्क केलेल्या वाहनांवर भिंत कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ नव्हती. शिवाय जॉगिंग ट्रॅक असणार्‍या पुढील भागात सायंकाळी भाजी विक्रेते बसत असल्याने त्या भागात गर्दीचे प्रमाण जास्त असते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker