छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने १५ जणांना तब्बल तीन कोटी ४१ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना २०१९ ते २०२१ दरम्यान नक्षत्रवाडीतील हिंदुस्थान आवास परिसरात घडली. फसवणूक करणाऱ्या दांपत्यासह त्यांच्या दोन मुला-मुलींविरोधातही सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भारती अर्जुन सूर्यवंशी, तिचा पती अर्जुन सूर्यवंशी, ऋषिकेश सूर्यवंशी, समीक्षा सूर्यवंशी अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
अश्विनी शहादेव भोसले (३१, रा. हिंदुस्थान आवास) यांनी फिर्याद दिली. संशयित भारतीशी दहा वर्षांपासून ओळख आहे. २०१९ मध्ये भारतीने फिर्यादीच्या घरी येत भिशीद्वारे चांगला परतावा मिळेल, असे म्हणत ५ हजार रुपये भरण्याचे सांगितले. ५ हजार रुपये भरल्यानंतर २०२१ पर्यंत परतावा मिळत होता. त्यानंतर अश्विनी यांना विविध ठिकाणी गुंतवणुकीचे आमिष दाखवले. महिन्याकाठी ५ टक्के परताव्याचे देऊ असे सांगितले. त्यावर फिर्यादीने एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२५ या कालावधीत भारती, तिची मुलगी समीक्षा या दोघींच्या बँक खात्यावर २९ लाख ४९ हजार पाठविले, तर भारतीला १५ लाख ५० हजार रोख दिले. भारतीने त्या बदल्यात फिर्यादीच्या खात्यावर १२ लाख रुपयांचा परतावा दिला. मात्र, पुढे परतावा मिळणे बंद झाले. भारतीने दिलेले चेकही बाऊन्स झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल झाला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














