छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : तीर्थरक्षा शिरोमणी प.पू. १०८ आचार्य श्री आर्यनंदीजी महाराज यांचा रजत समाधी महामहोत्सव रविवारी (दि.१५) एन-७ सिडको परिसरातील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर, सिडको आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था व सकल दिगंबर जैन समाजाच्या सहयोगाने आयोजित या कार्यक्रमास आचार्य श्री पवित्र सागरजी महाराज, मुनिश्री प्रशांतसागरजी महाराज व चर्या शिरोमणी मुनिश्री १०८ प्रभाव सागरजी महाराज यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता भगवंतांचा अभिषेक व आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या प्रतिमेचे पाद प्रक्षालन, सकाळी ८.३० वाजता शोभायात्रा सकाळी १०.१५ ध्वजारोहण, सकाळी १०.२५ वाजता मंडप उद्घाटन व आचार्य आर्यनंदी महाराज प्रतिमा अनावरण, सकाळी १०.३० वाजता दीपप्रज्वलन, त्यानंतर कन्नगी जैन मंगलाचरण सादर करतील. विशेष कथ्थक नृत्य विक्रांत वायकोस सादर करतील, सकाळी ११.३० वाजता गुरुपूजन, पाद प्रक्षालन, शास्त्र भेट, दुपारी १२ वाजता आर्यनंदी महाराज यांच्या जीवनावर शेखर भाकरे भारुड सादर करतील. यानंतर पाहुण्यांचे मनोगत, दुपारी १.१५ वाजता सामुहिक आचार्य परमेष्ठी जाप, १.४५ वाजता आचार्य पवित्र सागरजी महाराज, मुनीश्री प्रभाव सगारजी महाराज यांचे प्रवचन होईल. २.४५ वाजता डॉ. मेधा लखपती सामुहिक अहिंसा गीत सादर करतील. दुपारी २.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठया संख्येने जैन भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.














