नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत १६५ जणांचा अंत, ३०० भारतीयांसह ११०० बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर ३३ मृतदेह सापडले

Foto
नवी दिल्ली : नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुरामुळे आलेल्या महाप्रलयाने मानवी प्रयत्नांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. हिमस्खलनामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे.  नेपाळमधील या पूरस्थितीत जवळपास ३०० भारतीय बेपत्ता असून त्यात ईशा फाऊंडेशनच्या ७७ पर्यटकांचादेखील समावेश आहे. आत्तापर्यंत या पुरात १६२ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. या पूरस्थितीमुळे नेपाळमध्ये आत्तापर्यंत जवळपास १५०० नागरीक बेपत्ता झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

चीनच्या अधिकृत वेबसाइट  नुसार, तिबेटमध्ये ५५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. खराब हवामान आणि तुटलेल्या रस्त्यांमुळे ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांचा शोध मदत आणि बचाव पथके घेत आहेत. नेपाळी सैन्याने आज सकाळी रसुवा येथील तिमुरेमधून ११६ लोकांना वाचवले. यामध्ये ९५ नेपाळी आणि २१ भारतीयांचा समावेश आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी नेपाळ-चीन सीमेजवळ, काठमांडूच्या उत्तरेला जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीला, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे () ने हा ४.४ तीव्रतेचा भूकंप असल्याचे सांगितले. या दरम्यान, बर्फ आणि खडकांसह पर्वताचा एक मोठा भाग कोसळून ल्हेंडे खोला नदीत पडला. ही नदी भोटेकोशी नदीची उपनदी आहे, जी चीनमध्ये उगम पावते आणि खोल दर्‍यांमधून नेपाळमध्ये प्रवेश करते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हिमनदीचा एक मोठा भाग पर्वतापासून तुटून खाली पडला असावा. तथापि, या घटनेचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात. नंतर, यूएसजीएसने स्पष्ट केले की तो भूकंप नव्हता. भूस्खलन इतके शक्तिशाली होते की त्यामुळे ५.२ तीव्रतेच्या भूकंपासारखा कंप निर्माण झाला. याचा अर्थ असा की, भूकंप झाला नव्हता, तर भूस्खलनामुळे भूकंपासारखा कंप निर्माण झाला होता.

भारतात याचा परिणाम कुठे आणि किती होईल?
भारतात, याचा परिणाम प्रामुख्याने बिहारमधील गंडक नदी आणि तिच्याशी संबंधित लहान-मोठ्या नद्यांवर अपेक्षित आहे. नेपाळमधून सुमारे ३ मीटर उंचीच्या पुराच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली येथे विशेष दक्षता ठेवण्यात येत आहे. सीतामढी आणि शिवहारवरही लक्ष ठेवून आहेत. नेपाळमधील पाणी त्रिशुली नदीमार्गे गंडक नदीत पोहोचेल. यामुळे खालच्या बिहारमधील पाण्याची पातळी वाढू शकते. उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर येथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ईशा फाऊंडेशनचे पर्यटकही बेपत्ता!
दरम्यान, ईशा फाऊंडेशनतर्फे नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले जवळपास ७७ जण पुरात बेपत्ता झाल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. याशिवाय, तमिळनाडूतून नेपाळला गेलेले ३७ पर्यटकदेखील बेपत्ता झाले आहेत. मानसरोवर यात्रेसाठी भारतातून गेलेल्या पर्यटकांचादेखील नेपाळच्या पुरात बेपत्ता झालेल्या ३०० भारतीयांमध्ये समावेश आहे. याशिवाय, अनेक भारतीय पर्यटक पुरामुळे नेपाळमध्येच ठिकाठिकाणी अडकून पडले आहेत. नेपाळच्या मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे असंख्य पर्यटकांना नियोजित स्थळी पोहोचता येत नसल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.