जाधववाडीत २ हजार किलो प्लास्टिक जप्त; दोन विक्रेत्यांना ठोठावला ५० हजारांचा दंड

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरू केली असून, सोमवारी (दि.२७) जाधववाडी येथील पुरुषोत्तम बाहेती यांच्या स्वस्तिक प्लास्टिक आणि द्वारकाधीश ट्रेडर्स या दोन विक्रेत्यांच्या गोदामांवर छापा मारण्यात आला, या कारवाईत १,९१० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले असून, दोन्ही विक्रेत्यांकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत आतापर्यंत १३ हजार किलोपेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन
विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथकातील देविदास सुसर, बालाजी साबळे, पोपट सिसोदे, जयेश मगरे, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव व स्वच्छता कर्मचारी आणि झोन ४ व ५ चे देविदास सुसर, बालाजी साबळे, पोपट सिसोदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मनपा उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेत्यांविरोधात नियमितपणे कारवाई चालू राहणार आहे. प्लास्टिक साठा, विक्री किंवा वापर याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमभंग आढळल्यास अचानक छापेमारी करून दंडात्मक कारवाई केली जाईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions