औरंगाबाद: मागील वर्षीप्रमाणे यावषीही अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविली जात आहे. यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांकडे पाठ फिरवल्याचे दिसते. पहिल्या फेरीत केवळ 7 हजार 922 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून 21 हजार जागा रिक्त राहतील की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरतील अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
तीन वर्षांपासून अकरावी प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जात आहे. मागील वर्षी चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाले नाहीत. इतकेच नव्हे तर काही महाविद्यालयांमध्ये बर्याचशा जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी देखील चित्र तसेच असल्याचे दिसते. 110 महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. 29 हजार 100 जागा यावर्षी अकरावीसाठी भरायच्या आहेत. 16 हजार 484 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 हजार 703 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत अलॉटमेंट झाले आहे. परंतु प्रत्यक्षात त्यापैकी 7 हजार 922 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. तर 3 हजार 960 विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट होऊन प्रवेश घेतले नाहीत. अजून 21 हजार 178 जागा रिक्त आहेत. त्यामुळे पहिल्या यादीतीलच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले नाहीत. त्यामुळे 21 हजार जागा रिक्त राहिल्या तर शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरतील की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील अतिरिक्त प्रवेशावर शिक्षण विभागाने आळा बसविला पाहिजे. अतिरिक्त प्रवेश देणार्या महाविद्यालयांवर कारवाई केली पाहिजे. तेव्हाच शहरातील जागा भरतील, असेही बोलले जात आहे.
अतिरिक्त प्रवेशाला आळा घालावा.
शहरात सुविधा असतानाही विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश का घेतात याचाही विचार शिक्षण विभागाने करावा. ग्रामीण भागातील महाविद्यालयातील अतिरिक्त प्रवेशावर आळा घालावा. शहरातील महाविद्यालयात जागा रिक्त राहिल्या तर शिक्षकांना वेठीस धरू नये. शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये याठी आम्ही शिक्षण उपसंचालकांना पत्रही दिलेले आहे.
- संभाजी कमानदार,
सचिव, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.