सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे कपाशीच्या शेतात वखर हाकत असताना विजेचा धक्का लागून २२ वर्षीय शेतकरी संजय अंबादास फुले यांचा बैलासह मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन फुले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
अनधिकृत जोडण्यांचा सर्व्हे करण्याच्या सूचना या घटनेची गंभीर दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सिल्लोडसोयगाव मतदारसंघातील सर्व गावांमध्ये अनधिकृत वीज जोडण्यांचा तातडीने सर्व्हे करून त्या नियमानुसार बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अशा जोडण्या सुरक्षितपणे काढून टाकण्याचे निर्देशही दिले.
-- धोकादायक वीज यंत्रणा तातडीने दुरुस्त करा --
उघड्यावरील डीपी, लोंबकळणाऱ्या व जीर्ण वीजतारा तसेच धोकादायक व जीर्ण वीजपोल यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने वीज सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देत, भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी नियमित तपासणी व देखभाल करण्याचे निर्देश आमदार सत्तार यांनी महावितरणला दिले.
-- अवैध वीज जोडण्या करू नका; सुरक्षित वीज जोडणी करून घ्या --
नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध वीज जोडण्या करू नयेत. अवैध जोडण्यांमुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील अथवा शेतातील अवैध वीज जोडण्या तातडीने नियमानुसार करून घ्याव्यात. आणि सुरक्षित वीज जोडणीचा वापर करावा. निष्काळजीपणामुळे स्वतः चा किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.
संजय फुले यांच्या अकाली निधनाबद्दल आमदार सत्तार यांनी दुःख व्यक्त करत फुले कुटुंबीयांच्या दुः खात सहभागी असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, जिल्हा बँकेचे माजी संचालक नाना पा. कळम सरपंच दिलीप जाधव, उपसरपंच राजू बेलेवार, सुभाष लोणकर, पंडित कोके, सदाशिव फुले, संजय भोसले आदींसह शोकाकुल फुले परिवारातील सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.













