ढोरेगाव शिवारातून जप्त २२५ ब्रास वाळूची चोरी ; गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील ढोरेगाव परिसरातील शिवना नदीपात्रातून वाळू तस्करांनी २२५ ब्रास वाळू बेकायदा उपसा करून शेतकऱ्यांच्या शेतात साठवून ठेवली होती. या वाळूसाठ्यावर काही दिवसांपूर्वी तहसील प्रशासनाने जप्तीची कारवाई करून संबंधित जमिनीच्या सातबाऱ्यावर दंडाचा बोजा टाकला होता. मात्र, प्रशासनाच्या नजरेआड होत आठ दिवसांच्या कालावधीत ही संपूर्ण वाळू चोरट्यांनी लंपास केली आहे.

या चोरीची एकूण किंमत सुमारे ६६ लाख रुपये इतकी असल्याचे महसूल प्रशासनाने नमूद केले असून, या संदर्भात ग्राम महसूल अधिकारी गीता मुरलीधर सरग यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुदाम संजय चुंगडे (रा. पेंडापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पेंडापूर आणि ढोरेगाव शिवारात शिवना नदीपात्रातून अतिवृष्टीपूर्वी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात आला होता. तहसील प्रशासनाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गट क्रमांक ९ आणि ५६ मधील जमिनीवर साठवलेल्या वाळूसाठ्यावर जप्ती केली होती.

जप्त वाळूचे बाजारमूल्य १३ लाख २० हजार रुपये होते, तर दंडासहित एकूण किंमत ६६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र २ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत वाळू माफियांनी जेसीबी, हायवा, टिप्परच्या सहाय्याने ही वाळू चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, जप्त वाळूच्या सुरक्षेतील प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा गंगापूर पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास औदुंबर म्हस्के हे करीत आहेत.