कोर्टाच्या आदेशानंतर ज्वेलर्स कर्मचाऱ्यावर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) आकाशवाणी परिसरातील एका नामांकित ज्वेलर्सच्या नावाने सोन्याची भिशी आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकाची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी (दि. ३) जिन्सी पोलीस ठाण्यात ज्वेलर्सचा कर्मचारी संतोष पुंडलिक बुंधे (३८, रा. विद्यानिकेतन कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, फिर्यादीने तक्रारीत शोरूम मालक व मॅनेजरचे नाव दिलेले असतानाही पोलिसांनी त्यांना गुन्ह्यातून वगळल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी वसंत भानुदासराव केंद्रे (४७, रा. जिन्सी) यांची सप्टेंबर २०२१ मध्ये संतोष बुंधेशी ओळख झाली होती. आपण नामांकित ज्वेलर्समध्ये कामाला असल्याचे सांगून संतोषने त्यांना दरमहा ३० हजारांची सोन्याची भिशी सुरू करण्यास भाग पाडले. मुदत संपल्यावर सोने मागितले असता, त्याने आणखी १० महिने प्रत्येकी २० हजार रुपये भरल्यास जास्त सोने मिळेल, असे आमिष दाखवले. तसेच पैसे ठेवल्यास दरमहा २ ग्रॅम सोने आणि १ लाख रोख गुंतवल्यास २ हजार ५०० रुपये परतावा देण्याच्या विविध खोट्या योजना त्याने सांगितल्या. संतोषने सुरुवातीचे २ महिने थोडे सोने व परतावा दिला. सुरक्षेसाठी संतोषने त्यांना ज्वेलर्स मालकाच्या स्वाक्षरीचे कोरे धनादेश आणि मालकाच्या दुसऱ्या फर्मच्या नावाने पावत्याही दिल्या होत्या. केंद्रे यांच्यामार्फत काही मित्रांनीही पैसे गुंतविले आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













