गंगापुरकरांना २.३६ कोटींचा निधी : जयसिंगनगरमध्ये आधुनिक उद्यान प्रकल्प

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत गंगापूर नगर परिषद हद्दीतील जयसिंगनगर परिसरात साकार होत असलेले हिंदूसूर्य महाराणा प्रताप उद्यान सध्या प्रगतीपथावर असून, या प्रकल्पामुळे गंगापूर शहराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडणार आहे. शहरवासीयांना विरंगुळा, आरोग्य आणि सामाजिक संवादासाठी एक सुसज्ज सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. 

आमदार प्रशांत बंब यांच्या माध्यमातून आणि तत्कालीन माजी नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या उद्यानाच्या विकासासाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी रु. २ कोटी ३६ लाख इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. या निधीतून अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक उद्यान उभारण्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून, तो आराखडा शहरवासीयांसाठीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या प्रस्तावित उद्यानामध्ये बालक, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र आणि नियोजनबद्ध सुविधा विकसित करण्यात येत आहेत. उद्यानाच्या रचनेत पर्यावरणपूरक संकल्पनांवर विशेष भर देण्यात आला असून, हिरवळ, मोकळी जागा आणि नैसर्गिक सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे हे उद्यान केवळ विरंगुळ्याचे केंद्र न राहता शहराच्या पर्यावरण संतुलनासाठीही उपयुक्त ठरणार आहे. आराखड्यानुसार, लहान मुलांसाठी चिल्ड्रन प्ले एरिया आणि किड्स प्ले एरिया स्वतंत्रपणे विकसित करण्यात येत आहेत.

यामुळे विविध वयोगटातील मुलांना सुरक्षित, आनंददायी आणि विकासात्मक खेळाची संधी मिळणार आहे. खेळाच्या साहित्याची निवड करताना सुरक्षितता आणि दर्जा या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर हिरवळीचे (लॉन) क्षेत्र राखण्यात आले असून, नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी मोकळी व स्वच्छ जागा उपलब्ध होणार आहे.

युवक आणि आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी ओपन जिम उभारण्यात येत असून, यामुळे नागरिकांना नियमित व्यायामाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सीनियर सिटिझन्स हट उभारण्यात येणार असून, तेथे आरामदायी बसण्याची व्यवस्था, संवादासाठी मोकळी जागा आणि शांत वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय बुद्धिबळ, सापशिडी यांसारख्या मैदानी खेळांचीही तरतूद करण्यात आली असून, सर्व वयोगटातील नागरिकांना या उद्यानात वेळ घालवता येईल.

संपूर्ण उद्यान परिसरात फिरण्यासाठी सुबक पायवाटांचे जाळे, आकर्षक प्रवेशद्वार, स्वच्छतागृहे तसेच आवश्यक सोयीसुविधांचा समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग नागरिकांसाठीही सुलभप्रवेशाची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या या उद्यानाचे काम विविध टप्प्यांत प्रगतीपथावर असून, नियोजित वेळापत्रकानुसार पुढील १२ महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. 

हिंदूसूर्य महाराणा प्रताप उद्यान पूर्ण झाल्यानंतर गंगापूर शहरातील नागरिकांना आरोग्य, विरंगुळा आणि सामाजिक जीवनासाठी एक आदर्श सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प गंगापूरच्या शहरी विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. 
 
नक्षत्र गार्डन लॉन : उद्यानाच्या मध्यभागी गोलाकार रचनेत ङ्गनक्षत्र गार्डन लॉनफ विकसित करण्यात येत असून, हे या उद्यानाचे प्रमुख आकर्षणबिंदू ठरणार आहे. येथे सुबक बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, छोटे समारंभ आणि सार्वजनिक मेळावे आयोजित करण्यासाठी ही जागा उपयुक्त ठरेल. त्यामुळे उद्यान हे केवळ विश्रांतीचे ठिकाण न राहता सामाजिक एकोपा जपणारे केंद्र बनेल. 

हिंदूसूर्य महाराणा प्रताप उद्यान हा गंगापूर शहरासाठी केवळ एक विकासप्रकल्प नसून, तो नागरिकांच्या आरोग्यदायी आणि सुसंस्कृत जीवनशैलीकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि शासनाच्या सहकार्यामुळे या उद्यानासाठी मोठा निधी उपलब्ध होऊ शकला, या उद्यानाच्या माध्यमातून बालकांना सुरक्षित खेळाची जागा, युवकांना आरोग्य राखण्यासाठी सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांना शांत, आपुलकीचे वातावरण मिळणार आहे. पर्यावरणपूरक रचनेतून हिरवळ वाढवण्याचा आणि शहराचे सौंदर्य खुलवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे उद्यान पूर्ण झाल्यानंतर गंगापूरकरांना अभिमान वाटावा अशीच रचना करण्यात येत असून, नागरिकांनी या सार्वजनिक संपत्तीचे जतन करावे आणि सकारात्मक उपयोग करावा, हीच अपेक्षा आहे.