25 हजार स्वयंसेवकांनी केली शहराची स्वच्छता !

Foto
 
औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून कचरा कोंडीचा सामना करणार्‍या शहरात डॉ.  अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आज रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सुमारे 25 हजारांवर स्वयंसेवकांनी साडेतीन तासात वेगवेगळ्या 30 मार्गावरील रस्ते, नाली, स्मशानभूमी आदी परिसरातील सुमारे हजार टन कचरा साफ केला. 
  
  पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त रेवदंडा (जि.रायगड) येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात तसेच विविध ठिकाणी रस्त्यांवर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाला सकाळी 7 वाजता क्रांती चौक येथून प्रारंभ करण्यात आला. साडेदहा वाजेपर्यंत या मोहिमेअंतर्गत 25 हजारांवर स्वयंसेवकांनी तीस रस्त्यांवरील सुमारे 170 किलोमीटरचा परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानात एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते. यामध्ये कुठल्याच प्रकारचा गोंधळ किंवा नियोजनाचा अभाव अजिबात दिसला नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंसेवकांनी हे कार्य पार पाडले. यावेळी सुमारे हजार टन गोळा करून साफसफाई करण्यात आली.

  याकामी मनपाचे घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह सर्व प्रभागाचे अधिकारी, इएसआय, जवान आदींचे सहकार्य लाभले. त्यानंतर श्रीहरी पॅव्हेलियन येथे या महास्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, गजानन बारवाल आदींची उपस्थिती होती.  या अभियानांतर्गत उच्च न्यायालय परिसर, आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, आर.टी.ओ. ऑफिस, एस.एस.सी. बोर्ड, जिल्हा सत्र न्यायालय परिसर, पोलिस आयुक्‍तालय परिसर, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सर्व पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, रांजणगाव परिसर, पी.एस. कॉलेज, देवगिरी कॉलेज, हायटेक कॉलेज, मौलाना आझाद कॉलेज आदी 30 मार्गावर तसेच 12 स्मशानभूमी व दफनभूमीच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी 400 वाहनांची व्यवस्था केली.  स्वच्छता अभियानात सहभागी होणार्‍या सदस्यांना झाडू व इतर साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले होते.