जलवाहिनीचे २५ एअर व्हॉल्व्ह निकामी नव्या पाणी योजनेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; तज्ज्ञांकडून तांत्रिक तपासणी सुरू

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीवर बसविण्यात आलेल्या ८७ एअर व्हॉल्व्हपैकी तब्बल २५ एअरव्हॉल्व्ह निकामी झाल्याची बाब समोर आली आहे. अनेक व्हॉल्व्हची झडप बंद पडल्याने ते अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे नव्या योजनेसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेवर आणि एकूणच दर्जावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत 'महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा'च्या
मेकॅनिकल विभागाने संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण केले असून, सध्या या प्रकरणाची तांत्रिक तपासणी सुरू आहे. दोष आढळलेले व्हॉल्व्ह तातडीने बदलण्यासाठी आवश्यक पडल्यास स्वतंत्र शटडाऊन घेण्याचीही हालचाल सुरू आहे.
एअरव्हॉल्व्हचे मुख्य काम काय ?
▶ मुख्य जलवाहिनीमध्ये अडकलेली हवा बाहेर काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणे हे एअरव्हॉल्व्हचे प्रमुख काम असते. जलवाहिनीतील पाण्याचा दाब संतुलित ठेवण्याचे काम हे व्हॉल्व्ह करतात. व्हॉल्व्ह निकामी झाल्यास जलवाहिनीतील दाबावर विपरीत परिणाम होऊन पाणीपुरवठ्याची कार्यक्षमता पूर्णपणे कोलमडू शकते. म्हणूनच निकामी झालेले २५ व्हॉल्व्ह तातडीने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंपहाऊस दुरुस्तीमुळे पंपिंग ठप्प
नक्षत्रवाडी येथील नव्या पंपहाऊसमध्ये पहिल्याच पावसात गळती लागून पाणी थेट विद्युत पॅनलमध्ये शिरल्याने २४ जूनपासून शहराचा वाढीव पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. सध्या या पंपहाऊसचे वॉटरप्रूफिंग आणि विद्युत यंत्रणेची दुरुस्ती
सुरू आहे. तांत्रिक तपासणी आणि वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण होऊन तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतरच पुन्हा पंपिंग सुरू केले जाणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी शहराला आणखी किमान आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो.
Lin/https://epaper.sanjwarta.i Powered By: Vrudhee Solutions