नेपाळच्या महापुरात २८८ भारतीय संपर्काबाहेर; बचावकार्याला वेग

Foto
नवी दिल्ली : नेपाळ आणि तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून, भारतातील २८८ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली असून भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी नेपाळ आणि चीनमधील संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. 

या आपत्तीत पर्यटक, यात्रेकरू आणि इतर भारतीय नागरिक अडकले आहेत. कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भारतीयांचाही त्यात समावेश आहे. दरम्यान, २१ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या बाजूला सुमारे २०० भारतीय अडकले असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

नेपाळमध्ये बचावकार्य सुरू असतानाच काही भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेल्या बचावकार्यातही काही काळ व्यत्यय आला. भारताकडून मदत आणि बचावकार्य वाढविण्यात आले आहे.