गंगापूर न. प. च्या मतदार यादीवर ३ हजार हरकती

Foto

आक्षेपांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत दिली मुदत वाढ

गंगापूर, (प्रतिनिधी) आगामी गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत एकूण ३ हजार १९ हरकती आणि सूचना प्राप्त झाल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. तर आक्षेपासाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याने हरकती, सूचना वाढण्याची शक्यता आहे.

नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. गंगापूर शहरात आगामी निवडणुकीचे वातावरण आता अधिकच रंगतदार बनले असून, प्रशासन व राजकीय वर्तुळ दोन्हींकडून मोठी हालचाल सुरू झाली आहे.

गंगापूर नगर परिषद निवडणूक पुढील नोव्हेंबर महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. त्याआधीची शहरातील २० प्रभागांसाठी नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली. तर आगामी निवडणुकीसाठी मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी १३ ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. 


- नागरिकांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने आक्षेप नोंदविण्याची गंगापूर शहरात नगर परिषद निवडणूक संदर्भात  आक्षेप नोंदणीसाठी नागरिकांना अधिक वेळ देता यावा म्हणून मुदतवाढ देण्यात आली. प्रत्येक प्रभागात अधिकारी नियुक्त केले असून, मतदारांनी आपली तक्रार अथवा आक्षेप थेट त्या अधिकाऱ्यांकडे नोंदवावेत. आमचे उद्दिष्ट निवडणूक प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक ठेवण्याचे आहे.

संतोष आगळे, न. प. मुख्याधिकारी


मुदत वाढविण्यात आली आहे. आता १७ऑक्टोबरपर्यंत आक्षेप व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. १३ ऑक्टोबरपर्यंत एकूण ३ हजार १९ हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. तर मतदारांनी यादीतील चुका, नावांतील तफावत किंवा वगळलेल्या नावांविषयी आवश्यक तक्रारी व हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन गंगापूर नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

घराघरांत जाऊन जनसंपर्क वाढवू लागले ; 

नगर परिषद आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चित करण्यासाठी उमेदवार घराघरांत जाऊन जनसंपर्क वाढवू लागले आहेत. मतदारसंघनिहाय पॅनेलची आखणी, कार्यकर्त्यांचे गट बांधणी आणि मतदारांशी सुसंवाद यावर उमेदवारांचा भर आहे. विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष इच्छुक देखील आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

राजकीय समीकरणे नव्याने जुळविण्याची चढाओढ : 

दरम्यान, शहरातील प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदाचे खुला वर्ग असल्यामुळे व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची चुरस दिवसेंदिवस वाढत असून, राजकीय समीकरणे नव्याने जुळविण्याची चढाओढ सुरु आहे.

चौका चौकांत निवडणुकीची चर्चा  : 

या नगर परिषदेवर जवळपास तीन ते चार वर्षापासून प्रशासक आहे. तीन ते चार वर्षानंतर निवडणूक होत असल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, गुलाबी थंडीत गंगापूर तालुक्यातील सर्व ठिकाणी मोठा राजकारण तापणार आहे. गंगापूर शहरात सध्या चौका चौकांत नगर परिषद निवडणुकीची चर्चा रंगत आहे.